शेगाव आरपीएफचे मोठे योगदान: अल्पवयीन मुलाची पालकांशी घातली सुरक्षित भेट

शेगाव : रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) ने पुन्हा एकदा कर्तव्यनिष्ठा आणि सतर्कतेचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे. त्यांनी एका अल्पवयीन मुलाला सुरक्षितपणे त्याच्या पालकांपर्यंत पोहोचवले. ही घटना शेगाव रेल्वे स्टेशन परिसरात घडली, जिथे एका 12 वर्षीय मुलाने, जो गर्दीत हरवला होता, आरपीएफच्या सतर्क कर्मचार्‍यांच्या मदतीने आपल्या पालकांशी पुनः भेट घडवून आणली. त्यांनी “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” या मोहिमेअंतर्गत हि कारवाई केली.

शेगाव रेल्वे स्टेशनवर परिसरात  10 जानेवारी रोजी शेगाव रेल्वे स्टेशनड्यूटीवर असलेल्या आरपीएफ कर्मचारी शेख नावेद यांना स्टेशन परिसरात एक अल्पवयीन मुलगा संशयास्पद अवस्थेत फिरताना दिसला. त्यांनी त्या मुलाशी संवाद साधत त्याची आस्थेवाईक चौकशी केली.  यावेळी मुलाने आपले नाव सोहम उल्हास भारती (वय 12 वर्षे, रा. अकोला) असल्याचे सांगितले. त्याने सांगितले की, तो आपल्या पालकांसोबत शेगाव दर्शनासाठी आला होता, पण गर्दीत तो आपल्या आई – वडिलांपासून हरवला.

आरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्या मुलाला सहानुभूतीने आरपीएफ पोलीस ठाण्यात नेले आणि त्याच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण भरने यांनी स्टेशनवर सार्वजनिक उद्घोषणा करून त्या मुलाच्या पालकांना माहिती देण्याचे प्रयत्न केले. थोड्याच वेळात मुलाचे वडील उल्हास शामराव भारती (वय 45 वर्षे) आरपीएफ पोलीस ठाणे, शेगाव येथे पोहोचले. मुलाने आपल्या वडिलांना ओळखल्यानंतर, दोन पंचांच्या साक्षीने आवश्यक सर्व औपचारिकता पूर्ण करून त्या मुलाला त्याच्या वडिलांकडे सुरक्षित सुपूर्त करण्यात आले.

मुलाच्या वडिलांनी आरपीएफच्या टीमचे त्यांच्या तत्परतेबद्दल आणि मानवीय दृष्टिकोनाबद्दल आभार मानले. त्यांनी सांगितले की, शेगाव आरपीएफच्या सतर्कतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे त्यांचा मुलगा सुखरूप परत मिळाला.

रेल्वे सुरक्षा दल प्रवाशांना आवाहन करते की, जर रेल्वे परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा परिस्थिती दिसल्यास किंवा एखादा मुलगा किंवा मुलगी त्रस्त अवस्थेत आढळल्यास, तातडीने नजीकच्या आरपीएफ पोस्टला कळवा. आपली सतर्कता कोणाच्या मदतीचे कारण ठरू शकते.