शहादा हादरले ! शिक्षकाकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अकॅडमी तत्काळ बंद करण्याची मागणी

---Advertisement---

 

Shahada Crime : शहादा शहरातील प्रवक्ता अकॅडमीमध्ये शिक्षकाने ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘ऑल इज वेल’ या सकारात्मक आणि प्रोत्साहन देणाऱ्या वाक्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली असून, शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या कृत्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

‘ऑल इज वेल’चा आडोसा घेत विकृत चाळे

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित शिक्षक योगेश अरुण शेंडे याने २ जानेवारीला सकाळी दहाच्या सुमारास पीडित विद्यार्थिनीला स्पेलिंग पाठांतराच्या बहाण्याने कार्यालयात बोलावले. तिथे त्याने पीडितेला ‘ऑल इज वेल कसे बोलतात याचा आठवण्याचा प्रयत्न कर’ असे म्हणत गोंजारण्याच्या बहाण्याने लज्जास्पद वर्तन करण्यास सुरुवात केली. तिथे त्याने पीडितेशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, तिला जबरदस्तीने पकडून अयोग्य वर्तन केले. पीडितेने हिंमत दाखवत तिथून सुटका करून घेतली आणि घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला.

शिक्षण क्षेत्राला लागला डाग

योगेश शेंडे याच्या या विकृत कृत्याने अवघ्या शिक्षण क्षेत्राला काळिमा फासला गेला आहे. समाजात शिक्षकाला गुरू मानून आदराचे स्थान दिले जाते. मात्र, अशा वासनांध शिक्षकांमुळे पालकांचा शैक्षणिक संस्थांवरील विश्वास उडू लागला आहे. अशा घटनांमुळे प्रामाणिकपणे ज्ञानदान करणाऱ्या चांगल्या शिक्षकांचीही विनाकारण बदनामी होत असून, संपूर्ण शिक्षक समुदायाची मान शरमेने खाली गेली आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

गुन्हा दाखल आणि तपास

शहादा पोलिसांनी याप्रकरणी योगेश शेंडेविरुद्ध भारतीय न्यायसंहिता, पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार आणि पोलीस निरीक्षक नीलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर सुरू आहे.

इंग्रजीच्या नावाखाली गैरप्रकार

विशेष म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वीच शीतल अकॅडमीचे नामांतर करून प्रवक्ता अकॅडमी असे करण्यात आले होते. इंग्रजी शिकवण्याच्या नावाखाली या ठिकाणी संशयास्पद प्रकार सुरू असल्याचा आरोप करत, या अकॅडमीची सखोल चौकशी करून ती तत्काळ बंद करण्याची मागणी जनतेने केली आहे. या लंपट शिक्षकाविरुद्ध केवळ गुन्हा दाखल करून न थांबता, त्याला कठोर कायदेशीर धडा शिकवावा, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---