रावेर: मायक्रो फायनान्सच्या महिला बचत गटांनी खाजगी वित्तीय कंपनी बँकांकडून काढलेल्या कर्जाची रक्कम नाममात्र महिलांना देऊन उर्वरित मोठी रक्कम सीआरपी महिलेने हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे.
तालुक्यातील अजनाड येथील बचत गटातील महिलांनी तहसीलदार बी. ए. कापसे यांच्यासमोर ही कैफियत मांडली. याप्रकरणी गावातील बचत गटाच्या महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अजनाड येथे अनेक महिला बचत गट आहेत. येथील बचत गटाच्या सीआरपी महिलेने येथील बचत गटातील महिलांचा विश्वास संपादन केला, बचत गटाच्या नावावर कर्ज काढून बचत गटाच्या महिलांना मिळालेली कर्जाची रक्कम बचत गटाच्या महिलांना नाममात्र देऊन उर्वरित मोठी रक्कम हडप केली. कर्जाची रक्कम मी भरेल, असे सांगूनही तिने कर्जाची परतफेड खाजगी बँकेत केली नाही.
हेही वाचा : धक्कादायक ! औषध सांगून विद्यार्थिनींना द्यायचा दारू अन्…, शिक्षकाचा संतापजनक प्रकार
कर्जाचे हप्ते भरण्यासाठी खाजगी बँकांकडून तगादा होत आहे. या बचत गटाची सीआरपी महिलेने कर्जाची रक्कम न भरल्याने हा प्रकार उघडकीस आला. फसवणूक झाल्याने बचत गटाच्या ३०-४० महिलांनी तहसीलदारांकडे येऊन कैफियत मांडून आम्ही कर्ज भरणार नाही. आम्हाला कर्जात सूट मिळावी. संबंधित महिलेवर कारवाई करण्याची मागणी अजनाड येथील महिला बचत गटाच्या महिलांनी केली आहे.
हेही वाचा : दुर्दैवी ! वसतिगृहाच्या खोलीत विद्यार्थिनीने केलं असं काही, दरवाजा उघडल्यानंतर सर्वच थक्क
यासंदर्भात बचत गटाच्या महिला, खाजगी वित्तीय बँकेचे अधिकारी यांची तहसीलदार बी. ए. कापसे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठक होणार आहे.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांच्यासह एचडीएफसी बँकेचे तसेच काही बँकांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.