जळगाव : शहरासह परिसरात अवैध सावकारीचा प्रकार वाढीस आला आहे. या अवैध सावकारीला कंटाळून एका ३ ५ वर्षीय तरुणाने मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील चंदू अण्णा नगरात हि घटना घडली आहे .या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुकेश पाटील (35 ) रा. चंदू अण्णा नगर,जळगाव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मुलाच्या आजारपणासाठी आणि कोरोना काळात व्यवसायासाठी त्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जाचे पैसे परत मिळवण्यासाठी लवेश चव्हाण आणि त्याचे साथीदारांनी मुकेश यांना धमकावत होते. मुकेश यांची दुचाकी देखील लवेशने आपल्या साथीदारांसह हिसकावून घेतली आहे. खाजगी सावकारांच्या याच जाचाला कंटाळून मुकेश यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला आहे.
खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून मुकेश यांनी आज दि. २ ७ मार्च रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मुकेशला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नातेवाइकांनी लवेश चव्हाण आणि इतरांवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली असून, जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मयत मुकेशच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.