वरणगाव: तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील रहिवासी, आणि आई-वडिलांचा एकुलता मुलगा हितेंद्र प्रकाश सोनार (३२) याचा १ जानेवारी रोजी गुजरातमधील अंकलेश्वर येथे अपघाती मृत्यू झाला.
हितेंद्र सोनार एमएससीपर्यंत शिक्षण घेतले होते. तो गेल्या पाच-सहा वर्षांपासून अंकलेश्वर येथील एका कंपनीत नोकरी करत होता. त्याचे आई -वडील वरणगाव येथे मजुरी करुन गुजराण करत होते. त्याने त्यांना आपल्या सोबत अंकलेश्वर येथे नेले होते. हितेंद्र हा फार कष्टाळू होता. तो कंपनीतील कामातून मिळणाऱ्या फावल्या वेळात फर्निचरचे काम देखील करत होता. तो रात्री-दिवस कष्ट करत होता. याच कष्टच्या बळावर त्याने अंकलेश्वर येथे स्वतःचे घर देखील घेतले होते. दोन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता आणि त्याला दीड वर्षाची मुलगी आहे.
१ जानेवारी रोजी, हितेंद्र दुचाकीने नोकरीच्या ठिकाणी जात असताना त्याचा अपघात झाला. तो घरापासून काही अंतरावर मुख्य महामार्गांवर जात असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातात हितेंद्र गंभीर जखमी झाला. परंतु, त्याच्या मदतीसाठी रस्त्यावर कोणीही आले नाही, ज्यामुळे त्याच्या मेंदूतील रक्तस्त्राव झाला आणि तो घटनास्थळीच मृत्यूमुखी पडला.
अपघात झाल्यानंतर दीड तासांनी हितेंद्रच्या आई-वडिलांना या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाली. अपघाताची माहिती कळताच त्यांनी एक हंबरडा फोडला. तो ऐकून वरणगाव येथील मूळचे राहणारे महेंद्रसिंग राऊळ व अमर राऊळ मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले, परंतु त्याचे प्राण ते वाचवू शकले नाही.
हितेंद्रच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आई-वडील, पत्नी, मुलगी, काका आणि बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.