---Advertisement---
---Advertisement---
Crime News : निजामपूर पोलिस ठाण्यात आजपर्यंत दाखल गुन्ह्यांप्रकरणी जामदा गावात राबविण्यात आलेल्या महाकोंबिंग ऑपरेशनदरम्यान दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा फरार संशयितासह इतर गुन्ह्यांतील संशयितही पोलिसांच्या हाती लागले. संशयितांकडून १७ दुचाकींसह कार मिळून १८ वाहने ताब्यात घेण्यात आली.
निजामपूर पोलिस ठाण्यात आजपर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांतील फरार व हव्या असलेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये निजामपूर पोलीस ठाणे हद्दीतील जामदा गावात महाकोबिंग ऑपरेशन शुक्रवारी (२५ जुलै) पहाटे साडेतीनच्या सुमारास सुमारास राबविण्यात आले. त्यासाठी जिल्ह्यातून २० पोलिस अधिकारी, २२० पोलिस अंमलदारांसह २ आरसीपी पथकांनी शासकीय वाहनांचा फौजफाटा घेऊन जामदा गावात रेकॉर्डवरील संशयितांचा शोध घेतला.
त्यात निजामपूर पोलिस पथक दाखल गुन्ह्यांतील मागील दोन वर्षांपासून फरार असलेला पॉलिस्टर कोमलसिंग पवार (रा. जामदा, ता. साक्री) मिळून आला तसेच निजामपूर पोलीस ठाण्यातील संशयिताचे कोणतेही नाव निष्पन्न नसताना, त्यातील संशयित मीराबाई गोलीबाई पवार (रा. जामदा, ता. साक्री) व साहील सजनदास भोसले (रा. जामदा, ता. साक्री) या तिघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. याच गावात विनानंबरप्लेट व कागदपत्रे नसणे तसेच गुन्ह्यांतील १७ दुचाकीसह कार, अशी १८ वाहनेही ताब्यात घेण्यात आली.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातून २० पोलिस अधिकारी, २२० पोलिस अंमलदारांसह २ आरसीपी पथकांनी केली.