Krishna Andhale : संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे गेल्या तीन महिन्यांपासून तो फरार आहे, पोलिसांची अनेक पथकं त्याचा कसून शोध घेत आहेत. हत्येला तीन महिने होऊमही फरार आरोपीचा शोध घेण्यात अपयश आल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असतानाच आता कृष्णा आंधळेबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. आता फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या गंगाखेड रोडवरील दत्त मंदिर चौकात मंदिराजवळ कृष्णा दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्याच्यासोबत आणखी एक इसम होता. ते दोघेही काळ्या रंगाच्या बाईकवर बसून गेल्याचा दावाही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. कृष्णा आंधळेने तोंडाला मास्क आणि कपाळाला टिळा लावला होता, असे वर्णन सुद्धा स्थानिकांनी केले आहे.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करून खातरजमा करत आहेत. याआधी जानेवारी महिन्यात देखील कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा होती. नाशिकमध्ये आता पुन्हा कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान मागील महिन्यात देखील कृष्णा आंधळे हा नाशिकरोड परिसरात एका मंदिरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले होते. आता गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगर परिसरात कृष्णा आंधळे असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाची खातरजमा करत आहेत.