Crime News: अल्पवयीन मुलीवर भावी पतीने केला अत्याचार, जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : राज्यात महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अशा प्रकारची अत्याचाराची दुर्दैवी घटना उघड झाली आहे. यात एका अल्पवयीन मुलीचे तिच्या नात्यातील मुलाशी ठरले होते, लग्नापूर्वीच तिच्या भावी पतीने तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील एका गावात पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासोबत वास्तव्याला आहे. तिचे लग्न तिच्या चुलत आत्याच्या मुलाशी ठरले आहे. तो जामनेर तालुक्यात राहतो. पीडित मुलगी १६  वर्षांची असून ती सज्ञान झाल्यावर म्हणजेच १८  वर्षांची झाल्यावर लग्न करण्याचा निर्णय दोघांच्या परिवारातर्फे घेण्यात आला होता. यामुळे दोघांमध्ये फोनवरून संवाद सुरू होता. ऑगस्ट 2024 मध्ये, पीडित मुलीचा चुलत आत्याचा मुलगा, म्हणजेच भावी पती, तिला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी घरात कोणीही नसताना त्याने तिच्यावर जबरी अत्याचार केला.

या घटनेचा पर्दाफाश झाल्यानंतर, पीडित मुलीने तिच्या आई-वडिलांसह धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यानुसार, अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपीवर रविवार, 22 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12:30 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.