जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एका सरपंचासह तिघांना धुळे लाच लुचपत विभागाने अटक केली आहे. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अटकेतील आरोपींमध्ये सरपंच राजेंद्र महादू मोरे (57), ग्रामपंचायत शिपाई शांताराम तुकाराम बोरसे (50) आणि खाजगी इसम सुरेश सोनू ठेंगे (40) यांचा समावेश आहे.
चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे येथील 70 वर्षीय तक्रारदार यांनी धुळे लाच लुचपत विभागाकडे ग्रामपंचायतीविरुद्ध तक्रार केली होती. त्यांचे गट क्रमांक 57/2, 1 हेक्टर 64 आर क्षेत्र असलेल्या शेतजमिनीवर बहाळ ग्रामपंचायतीने हक्क दाखवून भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावर तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीविरुद्ध न्यायालयात कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता. यानंतर सरपंच राजेंद्र मोरे यांनी तक्रारदार यांना भेटून या शेतजमिनीच्या बाबतीत ग्रामपंचायतीकडून कोर्ट कचेर्यांचा त्रास न होण्यासाठी, त्यांना दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करण्याची मागणी केली.
तक्रारदार याने नकार दिल्यावर सरपंच मोरे यांनी त्यांच्याकडून 10 लाख रुपये लाच मागितली. त्यामध्ये पाच लाखांवर तडजोड झाली. 29 नोव्हेंबर रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. लाच रकमेतील पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये 26 डिसेंबर रोजी देण्याची तारीख निश्चित केली गेली होती.
गुरुवार, 26 डिसेंबर रोजी, खाजगी पंटर सुरेश ठेंगे याने लाच रकमेतील दोन लाख रुपये सरपंच राजेंद्र मोरे यांच्या घरात बहाळ रथाचे येथे स्वीकारले. त्यानंतर सापळा रचून सुरेश ठेंगे, सरपंच मोरे आणि ग्रामपंचायतीचे शिपाई शांताराम बोरसे यांना अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार राजन कदम, सुधीर मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील यांच्या पथकाने हा सापळा यशस्वीपणे रचला.