नंदुरबार: येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक बालक आणि एक तरुण गंभीरपणे जखमी झाले. 14 जानेवारी 2025 रोजी, सात वर्षीय कार्तिक गोरवे याचा गळा कापला गेला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच दिवशी, नायलॉन मांजामुळेच दुसऱ्या दिवशी 23 वर्षीय सूरज सुळ याचा गळा चिरला गेला. उपचारांच्या दरम्यान, डॉक्टरांनी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्याचे जीवन वाचवले, आणि त्याची प्रकृती सध्या धोक्याच्या बाहेर आहे.
निम्स रुग्णालयातील डॉ. राजेश वसावे, डॉ.शिरीष शिंदे, डॉ.सम्राज्ञी शिंदे, डॉ. सातपुते, डॉ. परांडे यांनी तरुणावर तातडीने ही यशस्वी शस्रक्रिया केली. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. अप्पर आतिष कांबळे, डीवायएसपी संजय महाजन, पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.
मकर संक्रांत हा सण सर्वत्र उत्सहात साजरा होत असतानाच 14 जानेवारी रोजी दुपारी नंदुरबार शहरातील मोठा माळीवाडा भागात राहणारा सात वर्षीय कार्तिक एकनाथ गोरवे या नातवाला घेऊन त्याचे आजोबा मोटरसायकलने जात होते. यावेळी मांजामुळे कार्तिकचा गळा कापला गेला. त्याला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, अति रक्तस्त्रावामुळे दुर्दैवाने उपचार चालू असताना कार्तिकचा मृत्यू झाला.
दरम्यान ही घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी मंगळवारी शहरातील जगतापवाडी येथील रहिवासी व मिरची पथारींवर काम करणारा सूरज युवराज सुळ (वय २३) हा तरुण सकाळी नेहमीप्रमाणे दुचाकीने कामावर जात असताना उड्डाणपुलावर त्याच्या गळ्याला मांजाचा फास आवळला गेला. यात तो गंभीर जखमी झाल्याने जागीच कोसळला. सुरज यास तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉ. राजेश वसावे यांनी सांगितले की, श्वासनलिका, रक्त वाहिन्या कापल्या गेल्याने प्रचंड रक्तस्राव झाला होता. वैद्यकीय पथकाने तातडीने शास्रक्रिया केल्याने तरुणाचा जीव वाचला. १०० हून अधिक टाके शस्त्रक्रिया करताना घालावे लागले तथापि श्वासनलिका आणि रक्तवाहिन्या जोडण्याच्या कठीण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. आता जखमी सुरेश याची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे असेही डॉ. वसावे यांनी सांगितले.