एरंडोल : सोमवार २३ डिसेंबर रोजी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान धरणगाव रस्त्यावर बजरंग ट्रेडर्स दुकानाजवळ एक भीषण अपघात घडला. शेतात पिकाला पाणी भरून दुचाकीवरून एरंडोलकडे घरी परत येणारे शेतकरी समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला जबर धडकले, ज्यामुळे ते गंभीरपणे जखमी झाले. त्यानंतर जखमी शेतकऱ्यांना रुग्णवाहिकेने जळगाव येथे उपचारासाठी नेत असताना पिंपळकोठे गावाजवळ त्यांचा मृत्यू झाला.
सोमवार, २३ डिसेंबर रोजी धरणगाव ते एरंडोल रस्त्यावर बजरंग ट्रेडर्स दुकानाजवळ अपघात झाला. एरंडोल येथील शेतकरी लहूदास पोपट महाजन (वय ५५) हे बजाज कंपनीच्या लाल रंगाच्या सिटी १०० (एमएच- १९ डीइ ९७२१) या दुचाकीने शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले होते. पाणी भरण्याचे काम आटोपून ते घरी परत येत असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीसोबत त्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात महाजन गंभीरपणे जखमी झाले.
त्यांना जळगाव येथे उपचारार्थ नेत असताना पिंपळकोठे गावाजवळ त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार, कपिल पाटील, संतोष चौधरी, नितीन पाटील, आणि योगेश महाजन हे करत आहेत.