मुक्ताईनगर : तालुक्यातील एका गावांत मुलीच्या भेटीसाठी आलेल्या पित्याची ही भेट अखेरची ठरली आहे. गावात फिरायला गेलेल्या पित्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला. घोडसगाव येथे मुलीच्या भेटीसाठी आलेल्या पित्याला पूर्णाड फाट्याजवळील हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने धडक दिली. यात या पित्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. मुक्ताईनगर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मयताचे नाव विकास रघुनाथ इंगळे (वय ५३) असे आहे.
विकास इंगळे हे वाघाडी ता. रावेर येथे वास्तव्याला आहेत. ते शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुलीला भेटण्यासाठी घोडसगाव येथे आले होते. सायंकाळी घरातून निघतांना विकास इंगळे हे गावात फिरून येतो, असे सांगून गेले होते. रात्री जवळपास साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या अपघाताची बातमी त्यांच्या जवायला देण्यात आली. मुलीचे नातेवाईक आकाश भालेराव यांनी मुलीचे पती सागर वानखेडे यांना फोनद्वारे अज्ञात वाहनाच्या धडक दिल्याने तुमच्या सासऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले.
वडिलांच्या अपघाताची बातमी कळताच मुलगी स्वप्नाली वानखेडे आणि त्यांचे जावई सागर वानखेडे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी यांनी विकास इंगळे यांना मृत घोषित केले. याप्रसंगी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.