धुळे : पोलीस कॉन्स्टेबल गुलाब शिंपी (36) यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार २७ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. रात्रीची ड्युटी करुन घरी जात असताना आनंदखेडे गावाजवळ हा अपघात झाला.
प्राप्त माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल गुलाब गोविंदा शिंपी (36) हे धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात वास्तव्याला होते. साक्री पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. ते दररोज दुचाकीने आनंदखेडे – साक्री अपडाऊन करायचे. काल रात्रीची ड्युटी असल्याने ते आज सकाळी कर्तव्य बजावून घराकडे निघाले होते. मात्र, आनंदखेडे गावाजवळच असलेल्या खाडी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीने ट्रक (जीजे 12/7447) ला मागाहून धडक दिली. यात गुलाब शिंपी हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची बातमी आनंदखेडे गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनेनंतर मित्रपरिवारासह आप्तस्वकीयांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांना उपचारासाठी धुळ्यातील हिरे रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिसात दुपारी उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते. पोकॉ. गुलाब शिंपी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 5 वर्षांची मुलगी ,3 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेने पोलीस दलासह आनंदखेडे गावात हळहळ व्यक्त होत आहे.