धुळे : राज्यात रस्ता अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात दुचाकी-चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघा भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर धुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिरपूर तालुक्यातील लौकी येथील रहिवासी असलेल्या दगडू भावका बंजारा (वय ५५) आणि रामचंद्र सदू बंजारा (४५) यांच्या बहिणीचे सेंधवाजवळील बारदवारी गावात निधन झालं. बहिणीच्या अंत्यविधीसाठी दोन्ही भाऊ आपल्या परिवारासह जात होते. ते दोन्ही भाऊ बहिणीच्या अंत्यविधीला दुचाकीवरून जात होते. मात्र, बहिणीच्या अंत्यविधीला पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत्यूनं गाठलं. दोघं ज्या दुचाकीवरून जात होते, त्याच दुचाकीला चारचाकीनं जोरदार धडक दिली. या धडकेत दोघा भावांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीनं धडक दिल्यानंतर चालकानं तेथून पळ काढला. दरम्यान, फरार वाहनचालकाचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
अपघात कसा घडला?
बहिणीच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीला दोघे भाऊ दुचाकीवरून निघाले होते. ते मुंबई-आग्रा महामार्गावरून जात होते. दुचाकी बिजासन घाटात आली. त्याचवेळी चारचाकी वाहनानं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ती धडक इतकी जोरदार होती की, यात ते दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.