जळगाव : जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील अवैध दारू विक्रते व अवैधरित्या चालविले जाणाऱ्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. या कारवाईत सुमारे ५ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच कारवाईचा धडका सुरु केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव तालुक्यात अनेक ठिकाणी छापे टाकून अवैध दारूचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात अवैध दारू विक्रत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. यात विविध भरारी पथकांच्या मदतीने जळगाव तालुक्यातील देऊळवाडे, भोलाणे आणि इतर भागात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये परिसरातील अवैध दारूच्या भट्ट्या देखील उध्दवस्त करण्यात आल्या आहेत.
या कारवाईत सुमारे ५ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ. व्ही.टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संबंधित पोलीस ठाण्यात दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.