शाळा, महाविद्यालय परिसरातील फिरणारे ‘आफताब’ दुर्लक्षितच…

तरुण भारत लाईव्ह न्यूज । चंद्रशेखर जोशी । दिल्लीतील लव्ह जिहादच्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली. समाजमन हळहळले. सामाजिक संस्थांनी घटनेचा निषेध केला. महिला संघटनांनी आंदोलने केली. गेल्या आठ-पंधरा दिवसांपासून हे सुरू असताना आता नवीन बातमी आली की, श्रद्धाची हत्या करणार्‍या आफताबने आणखी काही मुलींना अशाप्रकारे आपल्या जाळ्यात ओढले. उघडकीस आलेला हा एक प्रकार सुरू असताना आणखी काही प्रकरणे उघडकीस आली.

जळगावात काही वर्षांपूर्वी असे प्रकार झाले व आजही छुप्या पद्धतीने सुरू असतात. काही वर्षांपूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जाऊन अशाच एका आफताबने कुकर्म केले. स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते गजानन मालपुरे, मोहन तिवारी यांनी पाठपुरावा केल्यवमुळे हे प्रकरण उजेडात आले. आरोपीस त्याच्या एका परदेशातून भारतात शिक्षणासाठी आलेल्या मैत्रिणीसह अटक झाली. प्रकार असा होता की, या आरोपीची मैत्रिण काही मुलींना हेरून आपल्या मित्रापर्यंत नेऊन या मुलींना पार्टी देणे, त्याच्याबरोबर फोटो काढणे असे प्रकार प्रथम करत असे व नंतर एकमेकांचे मोबाईल नंबर देऊन त्यांच्यात संपर्क वाढवत, अलगत त्याच्या ताब्यात या मुलींना देत होती. या प्रकारांना काही मुलींनी विरोध केल्यावर त्यांना बदनामीची भीती दाखविण्यात आली. यावर काही मुलींनी न डगमगता पालकांपर्यंत हा विषय पोहोचवला.

मात्र त्यांना पोलिसांनी साथ न दिल्याने हे प्रकरण काही काळ दाबले गेले मात्र काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे ही प्रकरणे आल्यावर त्यांनी या पालकांना साथ दिली आणि पोलिसच काय एसआयटीचे खास पथक जळगावी येऊन गुन्हा दाखल झाला. तत्कालिन कुलगुरू स्व. सुधीर मेश्राम यांनी विद्यापीठातील काही कर्मचार्‍यांवरही कारवाई केली होती. या घटनेत दुर्दैवाने दोन्ही आरोपी पुराव्याअभावी सुटले पण अशी कृत्ये करणार्‍यांना काही काळ ब्रेक बसला होता. आता ‘श्रद्धा’च्या हत्येच्या प्रकारानंतर ठिकठिकाणच्या प्रकरणांवर मंथन सुरू झाले आहे. अजूनही काही प्रकार शहरात घडत आहेत त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील काही महाविद्यालये, शाळा, मेहरूण तलाव परिसर अशा काही ठिकाणी असे प्रकार होत असल्याचे लक्षात येते. काही कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनापर्यंत जाऊन तक्रारी दिल्या. पुरावे दिले पण त्यांनाच दम देऊन हाकलून लावले गेले. काही पालकांपर्यंतही ही मंडळी गेली पण त्यांनी आमची छकुली अशी नाही, असे सांगून या कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला.

‘श्रद्धा’ला श्रद्धांजली तर आहेच…तिच्या बाबतीत घडलेल्या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा पण तिच्या विचारसरणीला श्रध्दांजली कधी मिळेल? ज्यांनी जन्म दिला, वाढवलं, समाजात वावरण्याची शक्ती, शिक्षण दिले, प्रेमाचा वर्षाव केला त्यांना झिडकारून मनमानी करण्याच्या विचारसरणीला तिलांजली देण्याची वेळ येईल तो हिंदू समाजासाठी भाग्याचा दिन ठरेल. अशा प्रकारांमध्ये आता ‘मागच्यास ठेच पुढचा शहाणा’ हा वाक्प्रचार अमलात आणणे गरजेचे आहे. ‘लव्ह जिहाद’च्या नावाने केवळ खडे फोडत बसण्यापेक्षा या क्षेत्रात काम करणार्‍यांना साथ दिली गेली पाहिजे. एकत्र येऊन या घटनांना विरोध केला गेला पाहिजे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात फिरणारे रोमिओ हेरून त्यांना पोलीस प्रशासनाने शासन करावे.

प्रशासनाने निर्भया पथक तयार केलेल आहे. पथकाची गाडी फिरते पण गाडीत बसलेले मोबाईलवर बोलण्यात दंग असतात. त्यांची नजर चौफेर फिरली पाहिजे, हे होताना दिसत नाही. सामाजिक उद्रेक होण्यापूर्वी अशा कृत्यांना आळा घातला जावा. आफताबला फाशी व्हावी, अशी मागणी होत आहे, ती रास्त आहेच. ती झालीच पाहिजे पण आजुबाजुला नजरेत पडणार्‍या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हेदेखील तेवढेच खरे.