मोठी बातमी! कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणुकीच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता तब्बल २९ वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने निकाल देत त्यांना दोषी ठरवले आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

1995 मध्ये फसवणुकीचा आरोप: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी सरकारी दस्तऐवजांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी कोकाटे बंधूंवर सरकारी कागदपत्रांशी छेडछाड करून आर्थिक फायदा घेतल्याचा आरोप केला होता. नाशिक जिल्हा न्यायालयाने दोघांना दोषी ठरवत २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला आहे.

या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ शकते. आता पुढील काही दिवसांत कोकाटे यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.