---Advertisement---
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जनमानसात आजही शोककळा कायम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य हादरल्याचं चित्र आहे. बारामतीजवळ लँडिंगदरम्यान झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघाताच्या बातमीने संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, महाराष्ट्रभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी सकाळपासूनच बारामती परिसरात अजित पवारांचे समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. रुग्णालयाबाहेर अक्षरशः जनसागर उसळला होता. गुरुवारी काटेवाडी येथे अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. हजारो नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.
“परत या अजित दादा… एकच वादा अजित दादा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तर प्रत्येकाच्या मनात पोकळी होती.
दरम्यान, या दुःखद घटनेनंतर आणखी एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे.
उपमुख्यमंती अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या एका कट्टर समर्थकाचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुदाम बोडके (वय 63) असे मृत समर्थकाचे नाव असून ते दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावचे रहिवासी होते. सुदाम बोडके हे अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.
अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळताच सुदाम बोडके यांना तीव्र धक्का बसला. अचानक छातीत वेदना सुरू झाल्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नातेवाईकांच्या माहितीनुसार, ढकांबे गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली शाखा सुरू करण्याचे श्रेय सुदाम बोडके यांनाच दिलं जातं. त्यांच्या अचानक जाण्याने ढकांबे गावासह संपूर्ण दिंडोरी तालुक्यात शोककळा पसरली आहे. एका नेत्याच्या जाण्याने संपूर्ण राज्य हादरले, आणि त्या दुःखाच्या लाटेत एका निष्ठावान समर्थकाचाही जीव गेला. ही घटना केवळ राजकीय नाही, तर भावनिक नात्याची जिवंत साक्ष ठरत आहे.









