चिंताजनक! विद्यार्थी आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल, अशी आहे आकडेवारी

महाराष्ट्र : देशात सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत असल्याची राज्यासाठी धक्कादायक तर पालकांसाठी चिंताजनक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी) विभागाच्या २०२४ अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यामुळे पालकांनी सतर्क होऊन पाल्यांच्या सुरक्षितेला प्राधान्य देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. किंबहु‌ना त्यासाठी सर्व स्तरावर जाणीवपूर्वक उपक्रम राबविण्याची गरज आहे.

विद्यार्थी आत्महत्या राज्यात सर्वाधिक
विद्यार्थी आत्महत्या एक महामारी हा अहवाल आयसी-३ परिषदेत गेल्या महिन्यात सार्वजनिक करण्यात आला. त्यात म्हटले आहे. आत्महत्या करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्यानाही मागे टाकले आहे. ही माहिती चक्रावून टाकणारी आहे. देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल, दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू तर तिसऱ्या स्थानी मध्यप्रदेश आहे. या राज्यांमध्ये सर्वाधिक तरुणांनी आत्महत्या केल्या. या तीन राज्यातील एक तृतीयांश विद्याथ्यर्थ्यांनी हे चुकीचे पाऊल उचलले. गेल्या दशकात ०-२४ वर्ष वयोगटातील तरुणांची लोकसंख्या ५८२ दशलक्षवरुन ५८१ दशलक्ष इतकी कमी झाली आहे. विद्यार्थी आत्महत्येची संख्या ६,६५४ वरुन १३,०४४ वर गतीने वाढली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.आणि हाच खरा सामाजिकदृष्ट्या काळजीचा मुद्दा बनला आहे. आज मोबाईलचे महत्व अधोरेखित झाले आहे. ती एक गरज असली तरी मोबाईल सर्वस्व नाही. मुले मोबाईल हातात घेत एकांतवासात जातात. मोबाईल एक साधन आहे, त्या यंत्रावर आपल्याच बोटांचे वर्चस्व असते. त्यामुळे मोबाईलमधून नैराश्यातून बाहेर पडण्या ऐवजी ते अधिक तणावाच्या गर्तेत जाण्याची भीती असते. त्यानंतर असुरक्षिततेची भावना वाढीस लागते, अशा वेळी चुकीचे पाऊल उचलण्याची भीती निर्माण होते.

सात पैकी एकाला नैराश्य
देशात १५ ते २४ वयोगटातील सात तरुणांपैकी एकाला नैराश्य आणि उदासिनता अशा विकाराने मानसिक स्वास्थ बिघडते. सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. याची कारणे शिक्षण पूर्ण करताना पडणारा ताण, बदललेले वातावरण, साथसंगत अशी असू शकतात. हे चित्र बदलविण्याची गरज आहे. यासाठी कौटुबिय, शालेय, महाविद्यालय तसेच सामाजिक पातळीवर उपायांची कृती करणे आवश्यक आहे.

नाउमेद हेच घातक
मुले मुली यांना चांगल शिक्षण देण्यासाठी आई वडिल भरपूर पैसे खर्च करतात. त्यांना उत्कृष्ठ शाळा, महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी आग्रही असतात. मुलांनी मोठे होऊन चांगली नोकरीवर जावे आणि जीवन सुखी करावे, अशी भावना त्यामागे पालकांची असते. परंतु दुसरीकडे धावत्या युगात जीवनाची वाटचाल करताना त्यांचे पाल्यांकडे दुर्लक्ष होते. संवाद कमी होतो. मुलांच्या मनाला जाणून घेण्याची अस्था लयास जाते, हे थांबविणे आवश्यक आहे. पात्यांना बोलते करणे, त्यांना वेळ देणे, आणि त्यांच्या मनातील भावना जाणून घेणे, यासाठी पालकांनी पाऊले उचलणे आवश्यक आहे.

संयमता दृढ व्हावी
जीवन क्षुणभुंगर असले ती जीवनापेक्षा दुसरे काहीच मौल्यवान नाही, इतके जीवन अनमोल आहे. मात्र जीवनाची वाटचाल करताना अडचणी येतात. अपयश येते. केव्हा केव्हा पराभवही होतो. अथक प्रयत्न करुनही हातातून यश निसटते. अशा वेळी मनाला वेदना होतात. वाईट वाटते. मात्र हे शाश्वत नसते. त्यामुळे अशा परिस्थितीला सामोरे जाताना व्यक्तीमत्वाला संयमतेची जोड देणे शहाणपणाचे ठरते. वेळ, काळ पाठीशी राहील, ही भावना मनात दृढ असायला हवी.