---Advertisement---
Jalgaon Municipal Corporation Election : नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निकालानंतर आता सगळ्याच राजकीय पक्षांचे मिशन महापालिका सुरू झाले आहे. अर्थात आज (दि. २३ डिसेंबर) पासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धवसेना यांनी स्वबळाचा नारा देत, इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकत्र लढायचे की स्वतंत्र यावरून चर्चेचे गुन्हाळ सुरूच असून, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
उमेदवारी अर्ज ऑफलाइन की ऑनलाईन?
महापालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाइन पद्धतीनेच उमेदवारी दाखल करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन, निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाइन पद्धतीनेच उमेदवारी दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
असा आहे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम
नामनिर्देश पत्र आजपासून, २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर, ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाणनी, २ जानेवारी २०२६ अर्ज मागे घेण्याची मुदत, ३ जानेवारी २०२६ चिन्हवाटप व उमेदवारांची अंतिम यादी, तर १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे.
सर्व राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांच्या भाऊगर्दीत अपक्षांचीही तयारी
महापालिकेच्या ऑगस्ट 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत 75 जागांसाठी तब्बल 615 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत तब्बल 188 अर्ज बाद ठरून 427 उमेदवारांनी नशीब आजमावले होते. अपक्ष म्हणून तब्बल 200 उमेदवार होते. तत्कालीन भाजप-शिवसेना युतीत भाऊगर्दी होती. त्यातही उमेदवारी नाकारल्याने अनेक जण अपक्ष म्हणून लढले.
ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमी (एमआयएम)कडूनही सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आता तब्बल सात वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी गत निवडणुकीपेक्षा दुपटीपेक्षा अधिक इच्छुक लढण्यासाठी तयारीत आहेत.
भाजपकडे इच्छुकांचे 550, तर शिवसेना शिंदे गटाकडे इच्छुकांचे 350 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 200 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 150 पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेही 207 अर्ज, तर काँग्रेसकडे 40 ते 45 अर्ज प्राप्त झाले आहेत.
शहरातील 19 प्रभागांतूनही वॉडनिहाय अपक्ष म्हणूनही 500 वर इच्छुकांनी तयारी केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या 75 जागांसाठीची निवडणूक लढण्यासाठी अडीच हजारांवर इच्छुकांनी तयारी केली आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तळातून वर्तविली जात आहे.









