Allu Arjun : पुष्पा 2 च्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी घडली. या दुर्घटनेस अल्लू अर्जुन यास दोषी ठरवून त्यास अटक करत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आली होती. दरम्यान, तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनच्या याचिकेवर सुनावणी घेत त्याला अंतरिम जामीन मंजूर केला.
पुष्पा 2 च्या प्रीमियर शो संध्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या शो ला अल्लू अर्जुनसह चित्रपटाची स्टारकास्ट उपस्थित होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या दोन मुलांना गंभीर जखमांमुळे आयसीयू मध्ये दाखल करावे लागले. मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती.
१२-१ वाजेच्या दरम्यान, हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली. अटकेनंतर, अल्लू अर्जुनने तातडीने तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, आणि प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. नामपल्ली न्यायालयाने दुपारी साडेचारच्या सुमारास अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर काही तासांच्या आत तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनच्या याचिकेवर सुनावणी घेत त्याला अंतरिम जामीन मंजूर केला.
अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर चिरंजीवी, पवन कल्याण यांसारख्या मोठ्या स्टार्स त्याच्या कुटुंबाकडे पोहोचले, तर वरुण धवन, पायल रोहतगी सारख्या अभिनेत्यांनी त्याच्या समर्थनात विधाने केली.
रश्मिका मंदान्ना म्हणाल्या की, “जे घडत आहे त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना त्यांनी लिहिले की, यासाठी कोणा एका व्यक्तीला दोष देता येणार नाही.”
मृत महिलेच्या पतीनेही या प्रकरणात केस मागे घेण्याचे इच्छेचे संकेत दिले. त्याने म्हटले की, अल्लू अर्जुनच्या चेंगराचेंगरीशी कोणताही संबंध नाही आणि त्याला दोष देणं योग्य नाही.