---Advertisement---
अमळनेर : खान्देशातील ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतश्री सखाराम महाराज यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यात्रेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व आवश्यक बाबींवर काटेकोर नियोजन केले आहे.
यात्रास्थळाची पाहणी माजी आमदार शिरीष चौधरी आणि नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या असून नियोजनात कोणतीही त्रुटी राहू नये, यावर त्यांनी विशेष भर दिला.
भाविकांच्या सोयीसाठी परिसरात पथदिव्यांसह, स्वच्छता व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच तात्पुरत्या आरोग्य केंद्रांची उभारणी करण्यात येत असून, विविध ठिकाणी मदत कक्ष सुरू केले जाणार आहेत. वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीमही राबविण्यात येणार आहे.
यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने परिसरावर लक्ष ठेवले जाईल. वाहतुकीसाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून, भाविकांना मार्गदर्शन करणारे फलकही लावले जाणार आहेत.
यंदाचा यात्रोत्सव २७ एप्रिल रोजी होणार असून, पालखी सोहळा ६ मे रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन, नगरपालिकेचे अधिकारी, पोलीस यंत्रणा आणि स्वयंसेवक सर्व तयारीत गुंतले असून, उत्सव निर्विघ्न आणि सुरक्षित पार पडावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.









