जळगाव : वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठरलेल्या कन्येचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भाग्यश्री दिपक पाटील (रा. जानवे ता. अमळनेर जि. जळगाव ) असे मृत तरुणीचे नाव आहे. भाग्यश्री ही बारावीनंतर पोलीस खात्यात नोकरीचे स्वप्न पाहत होती. मात्र, त्यापूर्वीच काळाने तिच्यावर झडप घातली. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमळनेर तालुक्यातील जानवे येथे दिपक पाटील हे कुटुंबियांसह वास्तव्याला असून, दुग्ध व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, दीड महिन्यापूर्वीच त्यांचा मोटरसायकल घसरून अपघात झाला होता. त्यानंतर मुलगी भाग्यश्री ही दुग्ध व्यवसाय सांभाळत होती. नेहमीप्रमाणे भाग्यश्री ही १२ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दुचाकी (क्रमांक एम एच १९ ,ई बी ६०२७) ने दुधाचे कॅन घेऊन अमळनेर येथे येत होती.
दरम्यान, लोंढवे शिवारात अज्ञात वाहनाने तिच्या दुचाकीला कट मारल्याने ती थेट रस्त्यावर आडवे पडलेल्या झाडावर आदळली. या अपघातात भाग्यश्रीच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव सुरु झाला. या घटनेबाबत भूषण पाटील यांनी तात्काळ जानवे गावात माहिती दिली. ग्रामस्थांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले. या प्रकरणी नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस थानायत अज्ञात वाहन चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्णच
भाग्यश्री ही नुकतीच बारावी पास झाली होती. तिने जययोगेश्वर महाविद्यालयात बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते. तिला पोलीस खात्यात जायचे होते. मात्र, त्यापूर्वीच काळाने तिच्यावर झडप घातली. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.