बसमधून महिलेचे ९ तोळे सोने लांबवणाऱ्या चोरट्या महिलांना अमळनेर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील वरुड येथुन अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गंगा चैना हातगळे (वय ४०) गंगा सुभाष नाडे (वय ४५, दोन्ही रा. नेताजीनगर, यवतमाळ) अशी संशयितांची नावे आहेत.
प्रतिभा जिजाबराव पाटील (वय ४८, रा. गारखेडे, ता. धरणगाव) या ६ मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास धरणगाव येथून जळगाव ते दोंडाईचा बसमध्ये प्रवास करीत होत्या. त्यांच्या जवळील दोन बांगड्या, मंगलपोत हे दागिने त्यांनी पर्समध्ये ठेवले होते. त्यांच्या शेजारी दोन महिला बसल्या होत्या. या महिला अमळनेर येथील चोपडा नाका स्टॉप येथे उतरल्या. दरम्यान तक्रारदार महिलेने पर्स पाहिली असता त्यांना सोन्याचे दागिने मिळून आले नाही. त्यांनी बसमध्ये व आजूबाजूला शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी ८ मार्च रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याच्या शोधकामी पोलीस अधीक्षक यांनी पथकाला सूचित केले होते. त्यानुसार पथकाने तपासाला सुरुवात केली. संशयित नेमके कोठे वास्तव्य करतात, यावर पोलिसांनी तपास लक्ष्य केंद्रित केले. त्यानुसार प्राप्त माहितीनुसार तपासाचे चक्र फिरले. सातत्याने संशयित महिला मुक्कामाचे ठिकाण बदलवित होते. जळगाव, अकोला, बार्शी टाकळी, परतवाडा, मध्य प्रदेशातील तिगाव, पांढुरणा व इंदूर इत्यादी ठिकाणी संशयितांनी वास्तव्य केल्याचे तपासातून समोर आले. संशयित महिला पुढील मुक्काम कोठे करणार आहेत, याची गोपनीय माहिती पथकांनी काढली.
त्यानंतर या महिलांना वरुड (जि. अमरावती) येथून ताब्यात घेतले. महिलांकडून पथकाने ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या, ४ लाख २० हजार किमतीची पाच तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत असा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक केदार बारबोले आदेशाने अमळनेर पोलीस ठाणे गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हवालदार मिलिंद सोनार, कॉन्स्टेबल विनोद संदानशिव, कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, कॉन्स्टेबल नीलेश मोरे, कॉन्स्टेबल उज्ज्वलकुमार म्हस्के, कॉन्स्टेबल अमोल पाटील, कॉन्स्टेबल गणेश पाटील, महिला होमगार्ड नीलिमा पाटील, जळगाव पोलीस अधीक्षक नेत्रम कार्यालयातील कॉन्स्टेबल पंकज खडसे, कॉन्स्टेबल कुंदनसिंग बयस, कॉन्स्टेबल गौरव पाटील, कॉन्स्टेबल मिलिंद जाधव यांनी ही कारवाई केली. पथकातील उपनिरीक्षक नाम देव बोरकर हे पुढील तपास करीत आहेत.