शहरातील अमृत 2च्या कामाला सुरुवात, तीन झोनचे लवकरच सर्वेक्षण

तरुण भारत लाईव्ह ।१७ जानेवारी २०२३। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि महानगरपालिकेत यावर राजकारण्यांनी अनेकदा खलबत्ते केलेल्या अमृत 2च्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी शहरात अमृत 2 अंतर्गत मल्लनिस्सारण योजनेतील 2 चा विकास आराखडा तसेच मजीप्रसोबत करारनामा करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार मनपाकडून मजीप्राने अमृत 2 चा करारनामा व विकास आराखडा तयार करण्याच्या कामाची सुरुवात झाली आहे. यात शहरातील राहिलेल्या झोनचे सर्वेक्षण, डिजाईन, इस्टिमेंटसाठी मजीप्राने अतिरिक्त यंत्रणादेखील यासाठी वाढवली आहे.

जळगाव शहरात अमृत योजने अंतर्गत मल्लनिस्सारण योजनेचे काम पाच झोनमध्ये करण्यात आले. या कामांची विभागणी दोन टप्यात करण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्यात झोन क्र 1 व 4 चे मल्लनिस्सारण वाहिनी 220 किमी टाकण्यात आली आहे. याचे कामही पूर्ण होऊन यासाठी ममुराबाद रस्त्यावर 48 एमलडी क्षमतेचे मल्लनिस्सारण जलशुध्दीकरण प्रकल्प तयार केले आहे. अमृत 2 योजनेच्या कामाच्या बाबतीत 31 डिसेंबरपर्यंत डीपीआर 2 चे काम पूर्ण करून द्यायचे होते. पण मनपाने एका खासगी कंपनीला दिलेले काम ते पूर्ण करू न शकल्याने महापालिकेत अनेक वाद निर्माण झाले होते. यात सत्ताधारी, विरोधी पक्षापासून ते महापालिकेच्या भूूमिकेवर महासभेत चांगलेच आरोप प्रत्यारोप झाले होते. तदनंतर मनपाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला या योजनचा विकास आरखडा तयार करण्याचे कामाचा निर्णय घेतला. त्यानुसार या योजनेच्या कामाला शासनासकडून हिरवाझेंडा मिळाला असून करारनामा तसेच डीपीआर तयार करण्याच्या कामाला सुरवात करण्याच्या सूचना शासनाने मजीप्रा व महापालिका प्रशासनाला दिल्या आहे.

अमृत योजना 2 च्या विकास आराखडा तयार करण्यासाठी मजीप्राने आधी मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे आणले होते. मात्र मजीप्राने या योजनेच्या विकास आरखडा तयार करण्याचे काम हाती घेताच यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ वाढवले. यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती मजीप्रा अधीक्षक अभियंता एम. जी. गिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. यात कार्यकारी अभियंता एस. सी. निकम यांच्या अख्त्यारीखाली उपअभियंता मनोरे, एम. बी. चौधरी, के. डी. झाडे, शाखा अभियंता मराठे, अहिरे, गाजरे, यांत्रिकी अभियंता बहादुरे वकनिष्ठ अभियंता रोहीत सांगडे यांचा अमृत 2 च्या विकास आराखडा, सर्वेक्षण, डिझाईन, इन्सिमेन्ट कामकाजात सहभाग असणार आहे.