तरुण भारत लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२२ । धरणगाव तालुक्यातील जांभोरा येथे रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र, येथे सुरक्षा दर्शक सूचना नसल्यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. १७ डिसेंबर ला एका व्यक्तीचा जीव गेला होता त्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा एक अपघात घडला यात देखील एक व्यक्ती ठार झाला आहे. दरम्यान, या संबंधी दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.
नरेंद्र राजू बेंडवाल (वय ३१, रा. डीडी नगर पारोळा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. बेंडवाल हे दि.२३ रोजी रात्री आपली दुचाकी (क्र.एमएच.१९ डीझेड.६६९६) ने धरणगावहून पारोळा जात होते. धरणगाव ते पारोळा रोडवर जांभोरा गावाजवळ धरणगावकडील पुलाचे बांधकाम सुरु असल्याने तेथे पाण्याचे टकर उभे होते.
रात्री साधारण ११ वाजेच्या सुमारास रस्त्याचे काम सुरु असल्याबाबत सूचना नसल्यामुळे नरेंद्र बेडवाल यांना रस्त्यावर उभे असलेले टॅकर दिसले नाही. त्यामुळे त्यांची दुचाकीने सरळ टॅकरला धडक दिली. या अपघात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आकाश पचेरवार (रा. रामदेवसजीबाबा नगर, धरणगाव) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. दीपक पाटील हे करीत आहेत.
दरम्यान, रस्त्याच्या काम सुरु असल्यामुळे १०० मीटर अंतरावर त्यासंबंधी सूचना फलक रेडीअमने लावलेले असले पाहिजे जेणे करून वाहन धारकाना आपल्या वाहनांचा वेग कमी करण्यास वेळ मिळेल. परंतू या ठिकाणी कोणतेही काळजी घेण्यात आलेली नाही. एकाच आठवड्यात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला असून त्यांचे संसार उघडे पडले आहेत. त्यामुळे दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धीरेंद्र पुरभे यानी केली आहे.
आठवड्यात दुसरा अपघात
मागील आठवड्यात दि.१७ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास शाम भास्कर पाटील (वय ४०, रा. मंगरूळ ता. पारोळा) व जयवंत गोरख पाटील (वय २८, रा. मंगरूळ ता. पारोळा) असे प्लाटिना मोटार सायकल (क्र. MH १९ DW ५७८७) ने मित्र किरण भास्कर रोकडे (रा. धानोरे ता. धरणगाव) यांच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परत जात होते. धरणगाव ते पारोळा रोडवर जांभोरा गावाजवळ धरणगावकडील पुलाचे बांधकाम सुरु असल्याने शाम पाटील याच्या ताब्यातील मोटर सायकलचा वेग नियंत्रित न झाला नाही, त्यामुळे मोटार सायकल स्लिप होत जयवत पाटील हा तरुण मयत झाला होता.