जळगाव : जळगावमध्ये आणखी एका वकिलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. वकिलाच्या दुचाकी वाहनाला भरधाव कंटेनरने समोरून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी शहरातील नेहरू चौक येथे घडली. योगेश जालमसिंग पाटील (वय ४५, रा. दादावाडी, जळगाव) असं मयत वकिलाचे नाव आहे. धडक देणार्या कंटेनरसह चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मूळचे चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण येथील योगेश पाटील हे सद्या जळगाव शहरातील दादावाडी परिसरात वास्तव्यास होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते जिल्हा न्यायालयात वकिली करत होते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ते त्यांच्या ऑफिसमधील सहकार्यांना रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या पक्षकारांकडे कागदपत्रे घेण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर योगेश पाटील हे त्यांच्या (एम.एच. १९ सी.ई ६५११) या क्रमांकाच्या बाईकने नेहरु चौकातून रेल्वे स्थानकाकडे जात असताना रेल्वे स्थानकाकडून टॉवर चौकाकडे जाणार्या (एम.एच. १९ सी.वाय २२३१) या क्रमांकाच्या कंटेनरने योगेश पाटील यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातात पाटील यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
योगेश पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी मयत योगेश पाटील यांचे सहकारी वकील ॲड. यज्ञेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर हे करत आहेत.