Jalgaon Z. P. News : मिनीमंत्रालयासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

जळगाव : विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाल्याने उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांच्या जिल्ह्यात सर्वच जागा आल्याने विधानसभेनंतर इच्छुकांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राजकीय मोट बांधणीस सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने जि.प. साठी इच्छुकांनीही तयारी सुरू केली आहे. मात्र निवडणुका नवीन गट रचनेनुसार होणार की जुन्या याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे निवडणूक जुन्या की नव्या गटरचनेनुसार याबाबत संभ्रम कायम आहे.

नव्या गट रचनेनुसार जिल्हा परिषदेत आठ सदस्य वाढतील. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला जिल्ह्यात ११ जागा मिळाल्याने सध्या भाजप, शिवसेना राष्ट्रवादीसाठी वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकर लागाव्यात असा महायुतीतील सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांचा सूर आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शक्य तेवढ्या लवकर घेण्याची मागणी होत आहे. जिल्हा परिषदेत भाजप सदस्य ३३ होते. भाजपची सदस्य संख्या महायुतीला मिळालेल्या विधानसभेच्या यशामुळे वाढेल असे सध्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासक राज असल्याने पदाधिकारी नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे प्रशासक जि.प.चा कारभार पाहत आहेत. मात्र आता पुढील दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.

नव्या गटरचेनुसार सदस्य संख्या होणार ७५
जिल्हा परिषदेत सध्याच्या गटरचनेनुसार ६७ सदस्य आहेत. नव्या गटरचनेनुसार ८ सदस्यांची त्यात वाढ होणार आहे. त्यानुसार ही संख्या ७५ होणार आहे. जि.प. सदस्य संख्या नवीन रचनेनुसार वाढल्यास पंचायत समिती सदस्यांची संख्या १६ ने वाढणार आहे. पंचायत समितीचे ८ गण वाढणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे छत्रपती शाहू महाराज सभागृहाचे नूतनीकरण करून त्यात सदस्यांची बैठक व्यवस्था वाढविण्यात आली आहे. मात्र जि.प.त सलग दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रशासक राज आहे. त्यामुळे प्रशासक काळ निवडणुका झाल्याशिवाय संपुष्टात येणार नाही.


जि.प.तील पक्षीय बलाबल
एकूण सदस्य संख्या ६७
भाजप ३३, राष्ट्रवादी १५, शिवसेना १४,काँग्रेस ४, अपक्ष १