Assembly Election 2024 : जळगाव विभागातील ४०० लालपरीही निवडणूक कर्तव्यासाठी आरक्षित

जळगाव : लोकशाहीचा लोकोत्सव अर्थात महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी बुधवार, २० रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांत ३ हजार, ६१७ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटसह निवडणूक कर्तव्यावर नियुक्त कर्मचाऱ्यांची ने -आण करण्यासाठी जळगाव विभाग परिवहन महामंडळाच्या ४०० बसेस आरक्षित करण्यात आल्या असल्याची माहिती जळगाव विभागप्रमुख भगवान जगनोर यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ११ मतदारसंघ आहेत. विधानसभा मतदारसंघात ३६ लाख ७८ हजार ११२ मतदार असून शहरी व ग्रामीण भागात ३ हजार ६७७ मतदान केंद्रं आहेत. या मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी १६ हजार ३५२ अधिकारी-कर्मचारी यात १६ नोडल अधिकारी, ४०३ सेक्टर अधिकारी नियुक्त आहेत. मतदान केंद्रांवर ४,४९५ नियमित तर ८१९ इव्हीएम मतदान मशीन रिझर्व्ह आहेत. तसेच ४,४१५ कंट्रोल युनिट आणि ४,७८३ व्हीव्हीपॅट असे साहित्य आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, कर्मचारी असे ५ ते ६ मतदान कर्मचारी तसेच मतदान साहित्य मतदान केंद्रांवर पोचवण्यासह मतदान पार पडल्यानंतर परत आणण्यासाठी परिवहन महामंडळाच्या ४०० बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत.

जळगाव परिवहन महामंडळ विभागात ११ आगार असून सुमारे ८०० बसगाड्या आहेत. त्यातील निम्मे बसेस निवडणूक मतदान साहित्य कर्तव्यावर राखीव करण्यात आल्या आहेत. त्यात यावल आगार वगळता चोपडा ३०, भुसावळ १९, मुक्ताईनगर ४०, जळगाव ६३, अमळनेर ४०, एरंडोल ४०, यात धरणगावसाठी १८ आणि एरंडोलसाठी २२, चाळीसगाव ४८, रावेर ३६, पाचोरा ३९, जामनेर ३४ अशा विविध आगारातून एसटी बसेस मतदान साहित्य व कर्मचाऱ्यांची ने-आण करणार आहेत.

जळगाव विभागातील एसटी बसेस मंगळवार, १९ रोजी निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रांवर सोडल्यानंतर आगारात परत येतील व ठरावीक तसेच त्यांना नेमून दिलेल्या नियमित मार्गावर प्रवासी वाहतूक करतील. तसेच २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपूर्वी साहित्य घेण्यासाठी नेमलेल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान कर्मचारी व साहित्य घेऊन येतील, असे परिवहन विभागाचे बंजारा यांनी सांगितले.