Assembly Election 2024 : मतदान करून मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल ; पाचोऱ्यात सीमा सुरक्षा बलाच्या जवानाविरुद्ध गुन्हा

पाचोरा : मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सीमा सुरक्षा बल आसाम जवानाविरोधात मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील रहिवासी असलेले कमलेश हेमराज पाटील हे सीमा सुरक्षा बलात आसाम येथे कार्यरत आहेत. त्यांना पाचोरा मतदारसंघातील पोस्टल मतपत्रिका पुरविण्यात आली होती. मतदान केल्यानंतर त्यांनी ती व्हॉटसअॅपवर व्हायरल केली. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. पण त्याआधीच त्यांनी ती व्यक्तीगत मतदानाची पोस्टल मतपत्रिका व्हॉटसअॅपवर व्हायरल केली. परिणामी मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपावरून या जवानाविरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३६ (१ ग), १३६ (२ ख) अन्वये गुन्हा दाखल करण्यात वि आला आहे.
रणजित निंबा पाटील यांनी पाचोरा पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.

मतदान पत्रिकेचा फोटो मित्रांना पाठवला
या घटनेबाबत भडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांनी कमलेश हेमराज पाटील यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा कमलेश पाटील यांनी पोस्टल मतदान करून मतदान पत्रिकेचा फोटो त्याच्या मित्रांना व्हॉटसअॅपवर प्रसारीत केल्याचे कळवले आहे.