जळगाव : जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या ११ जागांवर निवडणूक होत आहे. यात ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. तर उमेद्वारांना ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. या ११ जागांसाठी अर्ज दाखलच्या अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातून २५८ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला असून छाननीनंतर २७ अर्ज बाद करण्यात आले आहेत. चोपडा व जळगाव शहर मतदार संघातून एकही उमेदवारी अर्ज अवैध ठरला नाही.
जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघात विविध पक्ष तसेच अपक्ष असे २५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सर्वात अधिक उमेदवारी अर्ज जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जळगाव शहर विधानसभा मतदार संघांत ३७ उमेदवार आहेत. या खालोखाल मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघांत ३० उमेदवार आहेत. जामनेर विधानसभा मतदार संघांत २६, पाचोरा व रावेर विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी २५, भुसावळ व एरंडोल विधानसभा मतदार संघात प्रत्येकी २२, चाळीसगाव विधानसभा मतदार संघ १९ , जळगाव ग्रामीण व अमळनेर विधानसभा मतदार संघ प्रत्येकी १८ तर सर्वाधिक कमी चोपडा विधानसभा मतदार संघांत १६ उमेदवारांनी अर्ज भरला आहे.
या सर्व २५८ अर्जांची छाननी केली असता यात २७ अर्ज अवैध ठरले आहेत. रावेर मतदार संघात शिरीष मधुकरराव चौधरी व जयश्री अमोल जावळे यांचा अर्ज अवैध ठरल्याने २३ उमेदवारी अर्ज वैध ठरली आहेत. भुसावळ मतदार संघांत रजनी संजय सावकारे , सुरेश वामन केदारे , उज्वला गजानन चंदनकार, अनुपकुमार प्रेमचंद मनुरे , प्रीती तोरण महाजन, कीर्ती सुरेश वानखेडे हे सहा उमेदवारांचे अर्ज अवैध तर १६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघांत विशाल गुलाबराव देवकर यांचा अर्ज अवैध ठरल्याने या मतदार संघांत १७ अर्ज वैध आहेत.
अमळनेर मतदार संघांत प्रदीप किरण पाटील व संगीता प्रमोद पाटील या दोघांचा अर्ज अवैध उर्वरित १६ अर्ज वैध ठरली आहेत. एरंडोल मतदार संघांत २२ पैकी गौतम मधुकर पवार व संतोष दगडू गुरव या दोघांचा अर्ज अवैध ठरला असून २० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. चाळीसगाव मतदार संघात १९ पैकी ३ अर्ज अवैध ठरले आहेत. यात इनेश एकनाथ राठोड, प्रतिभा मंगेश चव्हाण, जय शरद पवार यांच्या अर्जांचा समावेश आहे. पाचोरा मतदार संघांत सुरेश पांडुरंग पाटील यांचा अर्ज अवैध ठरला आहे. पाचोरा मतदार संघांत २४ अर्ज वैध ठरला आहे. जामनेर मतदार संघांत २६ पैकी २२ अर्ज वैध ठरले आहेत तर डिगंबर केशव पाटील , साधनाबाई गिरीश महाजन, आचार्य शिवचरण रामपुरी गोसावी, बाबासाहेब भालचंद्र बोरसे या चौघांचा अर्ज अवैध ठरला आहे. मुक्ताईनगर मतदार संघांत ३० पैकी ६ अर्ज अवैध तर २६ अर्ज वैध ठरली आहेत. अवैध अर्जामध्ये यामिनी चंद्रकांत पाटील, चंद्रकांत निंबा पाटील मु.पो. खडके बु., अमर मनोहर बढे , प्रमोद माधव बोदडे , काशिनाथ राजाराम पाटील , चंद्रकांत निंबा पाटील मु. डोंगरगाव यांच्या अर्जांचा समावेश आहे.