Assembly Election 2024 : पाचोरा, मुक्ताईनगरची विधानसभा निवडणूक विशेष चर्चेत

जळगाव : महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी निवडणूक होत असली तरी बंडखोर आणि अपक्ष उमेदवार अशी निवडणूक आहे. विशेषतः पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल आणि मुक्ताईनगर या मतदारसंघात नामसाधर्म्य असलेले उमेदवार एक नव्हे, दोन नव्हे, तर तीन-तीन उमेदवार त्यादेखील महिला उमेदवार हा जिल्ह्यातील मतदारांना एक धक्काच आहे.
पाचोरा मतदारसंघात वैशाली सुर्यवशी नावाच्या दोन महिला तसेच अमोल शिंदे नामक दोन उमेदवार आहेत. दोन उमेदवार शहरी भागातील तर दोन उमेदवार वेगवेगळ्या तालुक्यातील शेवटच्या टोकातील गावाचे रहिवासी असून मधले नाव मात्र वेगवेगळे आहेत. याउलट चाळीसगाव मतदारसंघात देखील दोन उमेदवारांची नावे सारखीच असून महायुती भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण कमळ चिन्हावर तर अपक्ष उमेदवार मंगेश रमेश चव्हाण हे फळाची टोपली चिन्हावर आहेत. तर एरंडोल, जळगाव शहर मतदारसंघात देखील दोन उमेदवारांची नावे सारखीच आहेत.

रोहिणी नावाच्या चार महिला, तर चंद्रकांत पाटील नावाचे तीन उमेदवार
मुक्ताईनगर मतदारसंघात सारखीच नावे असलेल्या तीन महिला आणि तीन पुरूष उमेदवार आहेत. मतदारसंघात महायुतीचे आमदार चंद्रकांत पाटील आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्यात आमनेसामने लढत आहे. मात्र यातील अन्य तीन महिला उमेदवार स्थानिक शहरी वा ग्रामीण भागातील नसून वाशिम, अकोला आणि पुणे अशा जिल्ह्यातील म हिला उमेदवार मुक्ताईनगरची निवडणूक लढवित आहेत. माघारीनंतर उमेदवार यादी प्रसिद्धीनंतर मुक्ताईनगरकरांनाच नव्हेतर जिल्हावासीयांनादेखील ‘रोहिणी’ नावाच्या अनेक उम `दवारांना पाहून आश्चर्याचा धक्काच बसला आहे. चित्रपटात शोभेल अशीच चित्रकथा मुक्ताईनगर निवडणुकीतील नावांमुळे चर्चेत आहे. मुक्ताईनगरकरांच्या कानावर रोहिणी कवळे हे नाव प्रथमच ऐकले आहे पुणे तेथे काय उणे यानुसार पुण्याच्या चिखली तालुक्यातील इंदापूरच्या रहिवासी असलेल्या रोहिणी कवळे या मुक्ताईनगरच्या आखाड्यात उतरत्या आहेत. मतदारांनी कधीही त्यांना प्रत्यक्षात पाहिलेले नसून त्यांना ‘दूरदर्शन’ चिन्ह असून दूरदर्शन नावाचा योगायोग आहे. दुसऱ्या रोहिणी खडसे अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील बाभूळगाव येथील आहेत. त्यांना सफरचंद हे चिन्ह मिळाले आहे. तर तिसऱ्या वाशिम जिल्ह्यातील नागरतास, ता. मालेगाव रोहिणीताई खडसे या अपक्ष उमेदवार ‘बेबी वॉकर’ चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघातील लढतींमध्ये आणखी एक भर पडली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातीलच चंद्रकांत पाटील आणि चंद्रकांतभाऊ पाटील या नावाने दोन अपक्ष उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. हे दोन्ही उमेदवार रोड रोलर आणि ऑटो रिक्षा चिन्हावर निवडणूक लढवित आहेत.