जळगाव : शहर आणि जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. आपले उमेदवार प्रत्येक निवडणुकीत लाखोंच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. आपल्या या यशस्वी परंपरेला गालबोट लावणाऱ्या बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायमचे बंद करण्यात आले आहेत. पक्षाने ज्यांना मोठे केले, पदे दिली आणि तेच पक्षाला अडचणीत आणत आहेत. अशा बंडखोरांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
विधानसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे. जळगाव शहर मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांना जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरेश भोळे हे तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.
बंडखोरांच्या धमक्यांना भीक घालू नका, शहरातील काही बंडखोर उमेदवार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रचार करीत असताना धमक्या आणि दमदाटी केल्याचा प्रकार माझ्या कानावर आला आहे. असे प्रकार मी मुळीच खपवून घेणार नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कुठल्याही गोष्टीला न घाबरता, भीक न घालता आपल्या पक्षाचे, संघटनेचे आणि अधिकृत उमेदवाराचे काम इमानेइतबारे आणि अधिक जोमाने करावे. आपल्या पाठीशी पक्ष, संघटना आणि मी स्वतः उभा आहे. आपल्याला कोणीही त्रास दिला किंवा दमदाटी केली तर मला निरोप पाठवा, त्यांना कायद्याने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.