धुळे : महाराष्ट्र विधान सभेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत राजकीय पक्ष आपआपले उमेदवार जाहीर करत आहेत. तर दुसरीकडे विधान सभा २०२४ निवडणूक सुरळीत पार पाडावी याकरिता प्रशासन देखील विविध उपाययोजना राबवत आहे. यात मतदारांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा याकरिता जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जनगृतीसाठी विविध माध्यमांचा वापर प्रशासनाकडून केला जात आहे. असे असले तरी साक्री तालुक्यातील गावकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन करुन देखील त्यांच्या समस्येवर तोडगा न काढल्याने विधान सभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांच्या या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहर व परिसरातील नागरिकांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. झोपलेल्या प्रशासनास जागरुक करण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर पिपळनेरकर ठाम असून या निर्णयापासून आपण मागे हटणार नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.
मागील पाच वर्षांपासून पिंपळनेर शहरातील राष्ट्रीय महामार्ग ७५५ जी या मुख्य रस्त्याचे काम प्रलंबित आहे. रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. मागील कित्येक महिन्यांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांतर्फे वारंवार रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु , ग्रामस्थांच्या या मागणीकडे प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आले आहे. सतत पाठपुरावा करुन देखील रस्ता दुरुस्त होत नसल्याने याला त्रासून पिंपळनेरकरांनी अखेर यासंदर्भात ठोस निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग संदर्भात वारंवार मागणी केली. यानंतर देखील प्रशासन सोयीस्करपणे रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आले आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय शहरातील नागरिकांनी घेतला आहे. सर्वानी एकत्र येत आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव एकमताने पारित केला आहे. या ठरावानुसार विधान सभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा पिपळनेर शहर व परिसरातील नागरिकांनी हा निर्णय घेतला आहे.