जळगाव : भारतीय जनता पक्षाने आपली ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत जळगाव जिल्ह्यातील ५ उमेदवारांचा समावेश आहे. भाजपचे वरिष्ठ नेते तथा संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले ना. गिरीश महाजन हे सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यापार्श्वभूमीवर ना. गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना ना. गिरीश महाजन म्हणाले की, बंडखोरी नव्हे, सर्व मित्रपक्ष युती धर्म पाळतील असा विश्वास व्यक्त केला.
महायुतीमधील सर्व मित्र पक्ष युतीधर्म पाळतील. बंडखोरी कोणी करणार नाही, तरीसुद्धा आम्ही याची दक्षता जरुर घेऊ. जामनेर विधानसभा मतदारसंघात मतदार आणि कार्यकर्त्यांनी विजयाच्या मताधिक्याचे राज्यात रेकॉर्ड होईल, असा निश्चय या निवडणुकीत केला आहे, अशी ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
रविवार, २० रोजी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यातील विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत मंत्री गिरीश महाजन यांना पुन्हा जामनेर मतदारसंघातून सातव्यांदा उमेदवारी मिळाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मंत्री महाजन म्हणाले, युतीमध्ये कोणी शिस्त मोडू नये. तसेच कोणी बंडखोरी करणार नाही, यासाठी पक्षीय पातळीवर काळजी घेतली जात आहे. राज्यात कुठेही बंडखोरी होणार नाही, असा विश्वास व्यक्त करुन त्यांनी यासंदर्भात आम्ही दक्षता घेत आहोत, असे सुतोवाच केले.
जामनेर विधानसभा मतदारसंघात पाच ते सहा सर्वेक्षण झाले. ते मी पाहिले. त्यामुळे कोणी आव्हान द्यावे, ते त्यांनी पहावे, असे स्पष्ट करत मंत्री महाजन पुढे म्हणाले, जामनेरमध्ये राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षाची उमेदवारी किंवा तिकीट घ्यायला कोणी तयार होत नव्हते. मात्र त्यांनी आमचाच उमेदवार पळविला आहे. घोडा मैदान समोर आहे, कोणाला किती मते मिळतात, ते त्यांनी बघावे, असे आव्हान त्यांनी दिले.