जळगाव : स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले असून त्यांना आचारसंहिता म्हटले जाते. यात निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य असते. यात राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांचं सर्वसामान्य वर्तन कसं असावं याविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच प्रचारसभा, मिरवणुका, रॅली काढण्याविषयी नियम आणि अटी दिलेल्या आहेत. यानुसार विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. यासमितीची कोणतीही परवानगी न घेता परस्पर सोशल माध्यमांवर जाहिरात प्रसारित करणाऱ्या ५ उमेदवारांना शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी नोटीस बजावण्यात आली.
विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांना विविध सोशल माध्यमांवर प्रचाराच्या जाहिराती प्रसारित करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची ( एमसीएमसी) परवानगी घेणे बंधनकारक आहे. यात सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, व्हाईस मेसेजस, बल्क मेसेजस अशा जाहिरातींचा समावेश आहे.
अशाप्रकारे सोशल माध्यमांवर जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी ती प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. परंतु, काही उमेदवारांच्या जाहिराती अशी कोणतीही परवानगी न घेता समाज माध्यमांवरून परस्पर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यानुसार जिल्ह्यातील ५ उमदेवारांना नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, उमेदवारांना सोशल माध्यमावर प्रचाराच्या जाहिराती प्रकाशित करावयाच्या असतील, त्यांनी जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची परवानगी घेऊनच जाहिराती प्रसारित कराव्यात, असे आवाहन जिल्हा माध्यम कक्षाकडून करण्यात आले आहे.