Assembly Election 2024: चोपड्यात भाजपा मंडल पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक उत्साहात

अडावद, ता. चोपडा : राज्याचे संकटमोचक ना. गिरीश महाजन तसेच केद्रींय राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ प्रचार नियोजन संदर्भात भाजपा शहर व ग्रामिण मंडल पदाधिकार्‍याची संघटनात्मक बैठक चोपडा येथे झाली. या संघटनात्मक बैठकीसाठी मंचावर महायुतीचे उमेदवार प्रा. चंद्रकांत सोनवणे, भाजपाचे जेष्ठ नेते आत्माराम म्हाळके, शांताराम पाटील, चोपडा विधानसभा मतदार संघ क्षेत्र प्रमुख गोविंद सैंदाणे, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील हे उपस्थित होते.

ना. गिरीश महाजन यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या सर्व अडचणी, समस्या ऐकून घेतल्या. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोबत राहून महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना विजयी करण्यासाठी आवाहन केले. तसेच केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांनी केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकारला जास्तीत जास्त विकासकामे करण्यासाठी महायुतीचे उमेदवार प्रा. सोनवणे यांच्या भरघोस मतांच्या विजयासाठी उपस्थितांना आवाहन केले.

यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांना निवडणूकीच्या प्रचारासाठी आवाहन केले व सर्वांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करणार अशी ग्वाही ना. गिरीश महाजन व केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षा खडसे जेष्ठ पदाधिकार्‍यांसमोर दिली. या संघटनात्मक बैठकीत जिल्हा, तालुका, शहर लोकप्रतिनिधी, शक्तीकेंद्र प्रमुख, प्रभागप्रमुख, बुथ प्रमुख पदाधिकारी यांनी चोपडा विधानसभा क्षेत्रात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, रि. पार्टी (आठवले) महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा. सोनवणे यांच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

यावेळी चोपडा शहर अहिर शिंपी समाजाच्या वतीने महायुतीचे उमेदवार प्रा. सोनवणे यांना निवडणूकीत समाजाचा पाठिंबा असलेले पत्र दिले. या संघटन बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील यांनी तर आभार शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मानले. यावेळी भाजपा ग्रामीण मंडळ, शहर युवा मोर्चा, किसान मोर्चा, महिला मोर्चा, कायदा सेल, तीर्थक्षेत्र विकास, एन.टी. सेल, ओबीसी सेलचे विविध पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.