मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 साठी राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघासाठी एका टप्प्यांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असून या निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची संख्या 4 हजार 140 असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी आज दिली.
मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघ पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप उपस्थित होते.
श्री.चोक्कलिंगम यांनी सांगितले की, राज्यातील लोकसभेच्या 16 – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर होता. त्यानुसार 288 विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 7,078 इतके नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी एकूण 2,938 अर्ज मागे घेण्यात आले आहे.