Assembly Election : जिल्ह्यात नोटाचा कोणाला होणार तोटा ?

जळगाव : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती आहेत. मागील पंचवार्षिकला १०० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या उमेदवारांना मात्र, त्या निवडणुकीत जिल्ह्यातील ११ मतदारसंघांमध्ये एकूण २५ हजारांहून अधिक मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारत ‘नोटा’ला मतदान केले होते. या २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत १३९ उमेदवार असून बऱ्याच ठिकाणी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची टक्कर आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘नोटा’चा तोटा कुणाला होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गतवेळी जळगाव शहर मतदारसंघात होता’नोटा’चा सर्वाधिक वापर
केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये योग्य उमेदवार नसल्यास मतदारांना ‘ईव्हीएम’ वरील ‘नोटा’चे बटण दाबून सर्वच
उमेदवारांना नाकारण्याचा पर्याय दिलेला आहे. २०१९ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांत एकूण २५ हजार ५८८ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारत सर्वच उमेदवारांना नाकारले होते. ‘नोटा’चा सर्वाधिक वापर जळगाव शहर मतदारसंघात झाला होता. या मतदारसंघात चार हजार ९९८ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला होता. अम ळनेर मतदारसंघात केवळ एक हजार ५०३ मतदारांनी हा पर्याय स्वीकारला होता.

गेल्या निवडणुकीत १०० उमेदवार

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १०० उमेदवार होते. त्यात विधानसभा क्षेत्र उमेदवार आणि नोटा मतदान याप्रामणे जळगाव शहर १३- ४९९८, भुसावळ १२- ३२७७, जळगाव ग्रामीण ११- २३८२, चोपडा ८- २१७५, जामनेर ९- २१०५, एरंडोल ८- १९९५, रावेर १०- १९४६, मुक्ताईनगर ७- १८०६, पाचोरा ७- १७२४, चाळीसगाव ८- १६७७, अमळनेर ७- १५०३ एकूण १०० उमेदवार २५,५८८ नोटा असे मतदान होते.

चुरशीच्या लढतीत फटक्याची भीती
जिल्ह्यातील सर्वात जास्त मुक्ताईनगर, पाचोरा आणि जामनेर या मतदारसंघात चुरशीच्या लढती होत आहेत. या ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मतांमध्ये जास्त अंतर नसते, अशा ठिकाणी ‘नोटा’च्या मतांचा फटका बसण्याची भीती असते. २०१९ च्या निवडणुकीत पाचोरा व मुक्ताईनगर मतदारसंघांत विजयी व पराभूत उमेदवारांच्या फरकाच्या आसपास ‘नोटा’ची मते होती. ही मते जर पराभूत उमेदवार आपल्याकडे वळवू शकले असते, तर चित्र वेगळे दिसले असते.