BabBaba Siddique Murder: धक्कादायक! बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी ‘इतक्या’ लाखांची सुपारी, जाणून घ्या कोणी दिली रक्कम

Baba Siddique Shot Dead in Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे पूर्व भागात तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोन आरोपिंना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या दोन्ही आरोपिंकडून धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. या आरोपिंना बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी किती लाखांची सुपारी मिळाली हे देखील स्पष्ट झाले आहे. आरोपिंनी दिलेल्या या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान वांद्रे पूर्व भागातील निर्मल नगर येथील कोलगेट मैदानाजवळ बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याचे कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेर ही घटना घडली. त्यानंतर दोन्ही आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली आहे. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्विकारली आहे. याबाबत सोशल मीडियात एक पोस्ट देखील फिरत असून या पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी स्विकारत सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

हत्येसाठी इतक्या लाखांची सुपारी

बाबा सिद्दीकी हत्याकांडातील दोन आरोपिंना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याची स्पष्ट झाले आहे. गोळीबार करणारे मारेकरी यांची बिश्नोई टोळीच्या सदस्यांशी पंजाबमधील तुरुंगात भेट झाली होती. तेव्हापासून बाब सिद्दीकी यांचे मारेकरी बिश्नोई टोळीच्या संपर्कात होते. आरोपींना बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी अडीच लाख रुपयांची सुपारी मिळाली होती, याबाबतची कबुली चौकशीदरम्यान मारेकऱ्यांनी पोलिसांसमोर दिली. सुपारीचे या रकमेतून मारेकरी प्रत्येकी 50 हजार रुपये वाटून घेणार होते, मात्र त्यापूर्वीच ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले. दरम्यान, मारेकरी हे 2 सप्टेंबरपासून कुर्ला येथे भाड्याने राहत असून त्यांना या खोलीचे दरमहा 14 हजार रुपये भाडे देखील दिले जात होते.