तरुण भारत लाईव्ह । ९ एप्रिल २०२३। राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा कडका तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जावरांचा मृत्यू देखील झाला आहे. तर, गहू, ज्वारी यासह आंब्याचा मोहर पूर्णपणे गळून गेला असून, नव्यानं लागवड केलेल्या भाजीपाल्याचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळं अनेक झाडं पडली आहेत. तर शेतामध्ये गारांचा खच पडल्याने संपूर्ण शेताला तलावाच स्वरूप आलं आहे.
अवकाळी पावसामुळं सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळं द्राक्षांच्या दारत देखील घसरण झाली आहे. तसेच बेदाना करण्यासाठी शेडवर टाकलेल्या द्राक्षावरही या अवकाळी पावसाचा परिणाम होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. जो बेदाना पूर्वी २०० रुपये किलोने जात होता. तो आता ५० रुपये किलोने जाण्याची शक्यता आहे. कारण द्राक्ष पिकाला हवामानाचा मोठा फटका बसला आहे.