खुशखबर ! जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच मिळणार भरपाई

जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा नुकसानभरपाईच्या रकमेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या योजनेतील विम्याच्या हप्त्याची रक्कम राज्य सरकारने भरली आहे. विशेषतः या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पंतप्रधान हवामानावर आधारित फळपीक विम्याची रक्कम ही १५ सप्टेंबरपर्यंत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, राज्य शासन व केंद्राचा हप्ता थकल्यामुळे ही रक्कम मिळू शकली नव्हती. मात्र, आता राज्य शासनाने ही रक्कम भरल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचा नुकसानभरपाईच्या रकमेचा मार्ग मोकळा झाला आहे.

दिवाळीच्या आधीच जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळू शकणार आहे. दरम्यान, २०२३-२४ या वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातील ५२ हजारांहून अधिक केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असून, ५४ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित आहे.