---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. दरम्यान, सलग तीन दिवस तापमान ८ अंश किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरतात. जिल्ह्यात १० ते १२ डिसेंबर या कालावधीत पारा ८ अंशांच्या खाली असल्याने, जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी विम्यासाठी पात्र होण्याची शक्यता आहे. त्या स्वरूपात शेतकऱ्यांना हेक्टरी ३२ हजार रुपयांची भरपाई मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून, त्यात तीन-चार दिवस थंडीची लाट निर्माण झाली होती. यामुळे किमान तापमान ८ अंश सेल्सिअसच्या खाली आले होते. हवामानावर आधारित फळ पीकविम्याच्या नियमांनुसार, सलग तीन दिवस तापमान ८ अंश किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरतात. जिल्ह्यात १० ते १२ डिसेंबर या कालावधीत पारा ८ अंशांच्या खाली असल्याने, जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी विम्यासाठी पात्र होण्याची शक्यता आहे. त्या स्वरूपात शेतकऱ्यांना हेक्टरी ३२ हजार रुपयांची भरपाई मिळण्याची शक्यता आहे.
केळी पीकविम्याच्या निकषांनुसार, १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत सलग तीन दिवस तापमान ८ अंशांच्या खाली राहणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील बहुतेक महसूल मंडळांमध्ये हे निकष पूर्ण झाल्याची शक्यता आहे. विमा कंपनीकडून या तापमानाची अधिकृत माहिती तपासली जाईल. प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यातील ५० हून अधिक महसूल मंडळे या निकषात पात्र ठरण्याची शक्यता आहे. यामुळे कमी तापमानामुळे पिकाचे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केळी पिकाला फटका
थंडीच्या या लाटेमुळे नव्याने लागवड झालेल्या केळीच्या कांदेबागाला फटका बसण्याची शक्यता असते. अति थंडीमुळे केळीची वाढ थांबते, पाने पिवळी पडू लागतात. तसेच, ज्या केळीची मृग बहाराची निसवण्याची वेळ असते, त्या प्रक्रियेवर देखील परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात कमी तापमान सलग राहिल्यास, शेतकऱ्यांना या नुकसानीसाठी विम्याचे कवच मिळत असते.









