बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात 13 टक्क्यांची वाढ; आर्थिक कामगिरीत भक्कम सुधारणा

---Advertisement---

 

मुंबई : बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2026 च्या तिसऱ्या तिमाहीअखेरीस आपले आर्थिक निकाल जाहीर केले असून बँकेच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बँकेच्या नफ्यात तब्बल 13 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. बँकेचा ऑपरेटिंग नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी वाढून 4,193 कोटी रुपये झाला आहे. तर आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत ऑपरेटिंग नफ्यात 4 टक्क्यांची वाढ होऊन तो 12,023 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

निव्वळ नफ्याबाबतही बँकेने दमदार कामगिरी केली असून, नऊ महिन्यांत निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 14 टक्क्यांनी वाढून 7,511 कोटी रुपये झाला आहे. तर केवळ तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा 7 टक्क्यांनी वाढून 2,705 कोटी रुपये झाला आहे. तिसऱ्या तिमाहीअखेरीस बँकेचा ROA 0.96 टक्के आणि ROE 15.34 टक्के इतका झाला आहे. नऊ महिन्यांच्या कालावधीत हे प्रमाण अनुक्रमे 0.90 टक्के आणि 14.49 टक्के इतके आहे.

बँकेच्या निव्वळ व्याजदर मार्जिनमध्येही सुधारणा झाली असून, तिसऱ्या तिमाहीसाठी जागतिक NIM 2.57 टक्के तर देशांतर्गत NIM 2.80 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. नऊ महिन्यांसाठी हे प्रमाण अनुक्रमे 2.51 टक्के आणि 2.76 टक्के आहे. कर्जवाढीच्या बाबतीत बँकेने मजबूत कामगिरी केली असून, देशांतर्गत कर्जवाटपात वार्षिक 15.16 टक्के, तर जागतिक कर्जवाढ 13.63 टक्के इतकी आहे. बँकेचा जागतिक व्यवसाय 16 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

रिटेल कर्जात वार्षिक 20.64 टक्के, कृषी कर्जात 16.69 टक्के, MSME कर्जात 15.77 टक्के, तर कॉर्पोरेट कर्जात 11.32 टक्के वाढ झाली आहे. एकूण कर्जांमध्ये RAM सेक्टरचा वाटा 58.54 टक्के आहे.

बँकेच्या ठेवींमध्ये वार्षिक 11.64 टक्क्यांची वाढ झाली असून, देशांतर्गत कर्जात 12.80 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी CASA ठेवींमध्ये वार्षिक 4.48 टक्क्यांची वाढ झाली असून, CASA चे प्रमाण एकूण ठेवींमध्ये 37.97 टक्के आहे.

आर्थिक वर्ष 2026 च्या नऊ महिन्यांत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) 18,442 कोटी रुपये असून, तिसऱ्या तिमाहीत ते 6,461 कोटी रुपये आहे. तिसऱ्या तिमाहीत व्याजेतर उत्पन्नात वार्षिक 30 टक्क्यांची वाढ होऊन ते 2,279 कोटी रुपये झाले आहे. तर नऊ महिन्यांत हे उत्पन्न 6,665 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
एनपीए बाबतीत पाहता, बँकेचा ढोबळ एनपीए गुणोत्तर 2.26 टक्के, तर निव्वळ एनपीए गुणोत्तर 0.60 टक्के आहे. पीसीआरमध्ये सुधारणा होत ते 93.60 टक्क्यांवर पोहोचले आहे. तिसऱ्या तिमाहीत स्लिपेज गुणोत्तर 0.16 टक्के इतके आहे.

भांडवली पर्याप्तता प्रमाण 17.09 टक्के इतके असून, डिजिटल बँकिंगमध्येही बँकेने मोठी झेप घेतली आहे. तिसऱ्या तिमाहीत डिजिटल आणि पर्यायी चॅनेल्सद्वारे 7 लाखांहून अधिक नवीन ग्राहक जोडले गेले असून, एकूण UPI ग्राहकांची संख्या 2 कोटी 42 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. एकूण व्यवहारांपैकी 96 टक्के व्यवहार पर्यायी चॅनेल्सद्वारे होत आहेत.

एकूणच, बँक ऑफ इंडियाची आर्थिक स्थिती भक्कम होत असून, नफा, कर्जवाढ आणि डिजिटल विस्तार या सर्वच आघाड्यांवर बँकेने सकारात्मक कामगिरी नोंदवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---