दिल्लीत होणार्‍या गर्जना रॅलीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय किसान संघाचा ऑनलाईन अभ्यासवर्ग

जळगाव : भारतीय किसान संघातर्फे दिल्ली येथे १९ डिसेंबर रोजी होणार्‍या गर्जना रॅलीच्या पार्श्‍वभुमीवर ऑनलाईन अभ्यासवर्ग ७ रोजी पार पडला. या अभ्यासवर्गात भारतीय किसान संघाचे प्रांत महामंत्री मदन देशपांडे यांनी किसान संघाच्या रॅलीचे प्रयोजन आणि मागण्यासंदर्भात विश्‍लेषण केले. मदन देशपांडे यांनी शेतीमालाला लाभकारी मुल्यावर आधारीत बाजारभाव, किसान सन्मान निधीतील वाढ, लाभकारी मूल्य आणि एमएसपी यातील फरक त्यांनी स्पष्ट केला. सर्व प्रकारच्या कृषी निविष्ठांवरील जीएसटी रद्द झाला पाहिजे आदी प्रमुख मागण्यांसाठी भारतीय किसान संघाची गर्जना रॅली दिल्लीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धडक देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रातांचे प्रसिध्दी प्रमुख संतोष गटणे यांनीही रॅलीच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट करीत शेतकर्‍यांना रॅलीसंदर्भात गावागावात माहिती व्हावी, यासाठी स्वत:च प्रचाराचे माध्यम समजून कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

लाभकारी मूल्य म्हणजे उत्पादन खर्चावर आधारीत बाजारभाव शेतीमालाला मिळावा, यासाठी भारतीय किसान संघाचा लढा अनेक वर्षांपासून सुरू असून त्यासाठी १९ डिसेंबरच्या किसान गर्जना रॅलीने सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. अभ्यासवर्गाला भारतीय संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव महाजन, जिल्हामंत्री डॉ.दिपक पाटील, कोषाध्यक्ष श्रीकांत नेवे, जिल्हा प्रचारप्रमुख रामदास माळी, चाळीसगाव तालुकाध्यक्ष विकास चौधरी, तालुका मंत्री राज महाजन दस्केबर्डी, प्रा.नितीनकुमार माळी, राहूल राजपूत, सुमित पाटील, धनंजय सुर्यवंशी, निलेश महाजन आदी उपस्थित होते.