भुसावळ येथील दाम्पत्य गुजरातमध्ये अपघातात ठार

तरुण भारत लाईव्ह न्यूज : भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉटमधील नाले दाम्पत्य गुजरातमध्ये झालेल्या अपघातात जागीच ठार झाले. रवी नाले (वय 62) असे मयताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. नाले हे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी होते.

रवी नाले व त्यांच्या पत्नी ह्या पावागडला दर्शन घेऊन रिक्षेने परत येत होते. तेव्हा चारचाकी वाहनाने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात नाले दाम्पत्य जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.

रवी नाले यांच्या शालकाची प्रकृती गंभीर असल्याने नाले दाम्पत्य अहमदाबाद येथे गेले होते. शालकाची तब्येेत चांगली वाटत असल्याने नाले हे सपत्नीक पावागडला दर्शनासाठी गेले. दर्शन घेऊन रिक्षाने परत येत असताना चारचाकी वाहनाने त्यांच्या रिक्षेला जबर धडक दिली. यात नाले दाम्पत्य ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबीय अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच नितीन धांडे, धीरज पाटील, दीपक धांडे, माजी नगरसेवक किरण कोलते, शिवसेना माजी शहराध्यक्ष बबलू बर्‍हाटे व माजी नगरसेवक तथा भाजप जिल्हा सरचिटणीस अजय भोळे यांनी अहमदाबाद येथे व्यवस्था लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले होते. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.