Bhusawl crime News : भुसावळ शहरात पत्रकारास मारहाण ः चौघांविरोधात गुन्हा

भुसावळ : विवाहितेला शिविगाळ केल्याचा पतीने जाब विचारल्यानंतर पत्रकारासह त्याच्या शालकाला गुंड प्रवृत्तीच्या चौघांनी शिविगाळ करीत मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री आठ वाजता शहरातील महेश नगरात घडली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जाब विचारल्याच्या रागातून उफाळला वाद
शहरातील महेश नगर भागातील रहिवासी पत्रकार विकास चव्हाण यांच्या पत्नी व संशयीत गिरीश पाटील यांची पत्नी परिसरातील भंडार्‍यात सोबत जेवणाला गेल्यानंतर संशयीत गिरीशने जुना वाद उकरून काढत ‘तु हिच्या सोबत जेवणला का गेली ? असा जाब आपल्या पत्नीला विचारला. त्यावेळी तक्रारदार महिलेने दादा तुम्ही अस का बोलताय ? असे विचारले असता गिरीशने जुना वाद उकरून काढत विवाहितेला शिविगाळ केली तसेच पीडितेच्या हातातील मोबाईल हिसकावला. पीडीतेने पत्रकार असलेल्या पती विकास चव्हाण यांना हा प्रकार कळवताच ते घरी आले व त्यांनी संशयीत गिरीशला जाब विचारला असता त्याने पत्राकार विकास चव्हाण यांनाही शिविगाळ केली. चव्हाण हे पत्नीसह पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, पुन्हा वाद वाढायला नको म्हणून त्यांनी तक्रार न देता घर गाठले.



चौघा संशयीतांकडून बेदम मारहाण
पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेल्याचा राग मनात धरत गिरीश पाटील याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी बोलावून घेत पत्रकार विकास चव्हाण, त्यांचे शालक विजय मिस्तरी व त्यांच्या सोबतचा हेमंत लोहार यास शिविगाळ करीत मारहाण केली. गिरीश पाटीलसह युवराज राठोड, राहुल गोसावी, डिगा सरोदे यांनी विजय मिस्तरी याच्या डोक्यात वीट मारत गंभीर जखमी केले. तसेच पत्रकार विकास चव्हाण, हेमंत लोहार यांनाही मारहाण केली.

याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयीत गिरीश पाटील, युवराज राठोड, राहुल गोसावी, डिगा सरोदे यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत पसार झाले असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.