भुसावळ : भुसावळ शहरातील वीज ग्राहकांना सातत्याने मिळणारे अवाजवी बिल व शेतकरी व वीज ग्राहकांची थट्टा चालवणाऱ्या निष्क्रीय अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यासाठी ऑल इंडिया संविधान आर्मी संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात तापी नगरातील महावितरण कार्यालयासमोर सोमवारी दुपारी आंदोलन करण्यात आले व महावितरण विभागाच्या विरोधात जोरदार निदर्शने करून कुलूप ठोकण्यात आले. य आंदोलनाने शहरात मोठी खळबळ उडाली.
मनमानी कारभाराचा निषेध शहरातील वीज कंपनीकडून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले देण्यात येत असून अनेक ग्राहकांना वेळेवर वीज बिले मिळत नाहीत शिवाय वीजपुरवठा खंडित होताच संबंधित कंपनीचा ग्राहक क्रमांक बंद केला जातो तसेच वीज ग्राहकांना सेवा न देता वीज बिलांची वसुली केली जात असल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया संविधान आर्मी संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक जगन सोनवणे, म ाजी नगरसेविका पुष्पा सोनवणे यांच्या नेतृत्वात हिंदू हौसिंग सोसायटी, तापी नगरातील कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली व वीज कंपनीच्या कार्यालयाला आंदोलकांनी कुलूप ठोकले. या आंदोलनानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा निषेध
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून निघृण हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया संविधान आर्मी संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक जगन सोनवणे व पदाधिकाऱ्यांनी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात नकली बंदुका नेत अनोखे आंदोलन (बंदूक मोर्चा) केले. यावेळी प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली तसेच भुसावळातील वाढत्या गुन्हेगारीचा निषेध करण्यात आला. माजी नगरसेवक जगन सोनवणे, संविधान आर्मीचे प्रदेश नेते राकेश बग्गन, हरीष सुरवाडे, पीआरपी अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष आरीफभाई शेख, सम्राट बनसोडे, दीपक सोनवणे, सचिन बहारे, सुनील ठाकूर, गजानन चहाटे, शाकीर शहा रोशन शहा, अनिल सुरवाडे, हरुन शहा, चेतन सुरवाडे, पीआरपी तालुकाध्यक्ष संघपाल किर्तीकर आदी सहभागी झाले.