भुसावळ : पोलीस चौकीच्या उभारणीनंतर अप्रिय घटनांना आळा बसणार असून महिला वर्गालादेखील मोठा दिलासा मिळणार असल्याचा आशावाद आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केला.
शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील रिंग रोडवर आमदार सावकारे यांच्या निधीतून व माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या प्रयत्नातून बाजारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत शंभूराजे चौक पोलीस चौकीचे लोकार्पण दसऱ्याच्या मुहूर्तावर झाले. यावेळी आमदार बोलत होते.
शहराची जिल्हा निर्मितीकडे वाटचाल
आमदार म्हणाले की, शहरातील प्रांत व तहसील कार्यालयात झालेले वाढीव बांधकाम तसेच भुसावळ न्यायालयाला अतिरीक्त वरीष्ठ न्यायालयाचा दर्जा तसेच ग्रामीण व ट्रामा सेंटरचे वाढलेले प्रशस्त रूप हे सर्व नियोजन आपण जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने केले आहे. भुसावळातील पोलीस उपअधीक्षक कार्यालयासारखे प्रशस्त कार्यालय उत्तर महाराष्ट्रात नाही, येथे जिल्हा पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी बसेल, अशी व्यवस्था आपण केल्याचे म्हणाले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहराध्यक्ष युवराज लोणारी, उद्योजक मनोज बियाणी, जिल्हा सरचिटणीस परीक्षित बहऱ्हाटे, किरण कोलते, बापू महाजन, पिंटू ठाकूर, निक्की बत्रा, पं.स.चे माजी सभापती राजेंद्र चौधरी, हॉटेल खालसा पंजाबचे संचालक सारंगधर पाटील, मनीष पाटील आदी उपस्थित होते.