भुसावळ : भुसावळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई संदर्भांत ही बातमी असून या ठिकाणी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका उपनिरीक्षकासह त्याच्या पंटरला अटक करण्यात आली. गुन्हा दाखल न करण्यासाठी या अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून लाच मागितीला होती. किरण सोनवणे असे अटकेतील पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत लाचलुचपत विभागातर्फे मिळलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीनुसार भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षक किरण सोनवणे (वय ३९) यांनी पथकासह मंगळवारी (ता. १९) तक्रारदाराच्या घरी अवैध दारू विक्रीबाबत छापा टाकला होता. या कारवाईत तक्रारदारकडे ३० ते ३५ हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. पथकाने या दारूच्या बाटल्या जप्त करत तक्रारदाराकडून १० हजार रुपये घेतले होते. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाचेची मागणी देखील केली होती.
यासंदर्भांत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता, कारवाईदरम्यान दोन्ही संशयितांनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदारांना त्रास न देण्यासाठी प्रथम ५० हजारांची मागणी करून तडजोडीअंती ३० हजार रुपयांची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. शुक्रवारी संशयित किरण माधव सूर्यवंशी (वय ३७, रा. हुडको कॉलनी, भुसावळ) व खासगी इसमास ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पकडले. त्यांच्यावर फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.